Ad will apear here
Next
कहो ना आस निरास भई...
कुंदनलाल सैगलहिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या कालखंडात आपल्या गाण्यांनी लोकप्रियता मिळविणारे कलावंत म्हणजे कुंदनलाल सैगल. १८ जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन.. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘कहो ना आस निरास भई...’ या त्यांच्या एका गीताचा...
..........
‘मर के अमर है सैगल जिसका हर कोई दिवाना है’ अशी गीतरचना करून गीतकार शैलेंद्रेने ज्यांना गौरविले होते आणि हिंदी चित्रपटगीतांत त्यांचे नाव गुंफले होते ते गायक व अभिनेते कुंदनलाल सैगल यांचा स्मृतिदिन १८ जानेवारीला असतो. 

हिंदी चित्रपटातील गीतांचा उल्लेख होतो, तेव्हा सैगल यांचे नाव अग्रभागी असते. कारण आपल्या अवघ्या ४३ वर्षांच्या आयुष्यात या गायकाने संपूर्ण भारतात जी लोकप्रियता आपल्या गाण्यांनी मिळवली, ती निश्चितच ‘माइलस्टोन’ अशी होती. भारतीय चित्रपट जेव्हा बोलू लागला, तेव्हा म्हणजे १९३१ या वर्षाच्या आधी नुकतेच सैगल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 

१९३२च्या ‘मुहब्बत के आँसू’, ‘सुबह का सितारा’, ‘जिंदा लाश’ या चित्रपटांतून सैगल यांच्या नावाचा बोलबाला झाला होता. परंतु १९३३च्या ‘पूरणभगत’ या चित्रपटातील गीतांनी संगीतातील जाणकार लोकांनाही सैगल यांच्या गायनाची दखल घेणे भाग पडले. 

सैगल यांच्या जवळील गायनकलाही उपजतच होती. ११ एप्रिल १९०४ रोजी जम्मूमध्ये जन्मलेले कुंदनलाल सैगल लहानपणी ‘रामलीला’मध्ये भाग घेत आणि रसिकांची वाहव्वा मिळवत असत! नऊ-दहा वर्षांच्या मुलाची भैरवी ऐकून श्रोते भारावून जात असत. सैगल यांची आई उत्तम गात असे. त्यांच्याकडून ऐकलेले पंजाबी संगीत, जम्मू संस्थानातील सूफी संप्रदायी पीराकडून गाण्याची मिळालेली दीक्षा यांच्या आधारे सैगल यांची संगीतातील वाटचाल सुरू झाली. 

१९१९मध्ये ते वडिलांबरोबर जालंधरला स्थायिक झाले. तेथे हरिवल्लभ मेळ्यात नामवंत गायक हजेरी लावून जात. तेथे सैगल यांनी खूप गाणी ऐकली. सूफी संप्रदायाच्या परंपरेतून त्यांनी गाण्याचे ज्ञान घेतले. अर्थात ऐन तारुण्यात या गायनाच्या आधारे उपजीविका होणे अशक्य होते. म्हणूनच त्यांनी काही काळ घड्याळ दुरुस्ती, टाइपरायटर विक्री अशी काही कामे केली; पण ते करत असताना गाण्यांच्या खासगी मैफलींमध्ये ते गात असत. 

जालंधरचे हरिश्चंद्रबाली यांच्या ओळखीने सैगल न्यू थिएटर्स संस्थेचे संगीतकार आर. सी. बोराल यांच्यापर्यंत पोहोचले. तेथे त्यांनी गाणी म्हणून दाखवली. ती ऐकून स्टुडिओतील सर्व जण भारावले. त्या वेळचे प्रसिद्ध बंगाली गायक के. सी. डे हेदेखील ती गीते ऐकून भारावून गेले. तिथून मग सैगल यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. तो काळ असा होता, की गायक-नट असेच कलावंताचे स्वरूप असे! परंतु सैगल यांना अकाली टक्कल पडले होते. त्यामुळे त्यांना चित्रपटाचे नायक म्हणून अयोग्य ठरवले गेले होते. नंतर केसांचा विग वापरून हा अडथळा दूर करावा लागला. कारण सैगल यांच्या आवाजातील जादू निर्माते हातातून घालवू इच्छित नव्हते. 

‘पूरणभगत ‘मधील ‘राधे रानी रे डरो ना..’ चंडिदास मधील ‘तडपत बीते दिन रैन...’, ‘यहुदी की लडकी’मधील ‘यह तसर्रुफ अल्लाह ...’ अशा गीतांनी चित्रपटप्रेमी नादावले. ‘देवदास’मध्ये तर सैगल स्टार ठरले. ‘बालम आए बसो मोरे मन में...’, ‘पिया बिन आवत नहीं चैन...’ ही त्या काळातील तरुणांची आवडती गीते होती. 

धूपछाँव, कारवाँ-ए-हयात, धरतीमाता, प्रेसिडेंट, दुश्मन या चित्रपटांतील गीतांमधून सैगल यांचे अर्थाच्या अनुषंगाने गायनाचे कसब त्यांना रसिकांचे लाडके गायक बनवून गेले. कलकत्याच्या चित्रपटसृष्टीतून मुंबईच्या चित्रपट जगतात येण्यास त्यांना कष्ट पडले नाहीत. १९४२पासून त्यांचा मुंबईतील चित्रपटांचा कालखंड सुरू होतो. त्यामध्ये भक्त सूरदास, तानसेन, भँवरा, तदबीर, शाहजहाँ, परवाना या चित्रपटांचा समावेश होतो. 

३८ चित्रपटांतील १२० गाणी आणि इतर तीस गाणी असा संगीत खजिना त्यांनी आपल्या जीवनकाळात संगीतप्रेमींसाठी तयार करून ठेवला! केवळ जन्मजात गायनकला होती, म्हणूनच हे यश त्यांना मिळाले असे नव्हे, तर गायनासाठी त्यांनी कष्टही तेवढेच घेतले. 

अनेक चित्रपटांतून गाणी गाऊन चांगले नाव झाले असताना ‘शाहजहाँ’ चित्रपटासाठी एक गीत रेकॉर्ड करताना त्यांनी ते गीत १४ वेळा पुन्हा पुन्हा गायले. त्या गीताचे संगीतकार नौशाद हे सैगल यांच्या तुलनेत तसे नवीनच होते. सैगल यांचे स्वतःचे समाधान होत नव्हते. आपण हे गीत यापेक्षा चांगल्या प्रकारे गाऊ शकतो या विचाराने ते पुन्हा पुन्हा गीत गात होते. त्यांचा हा प्रयत्न नौशाद बघत होते; पण सैगल यांच्या पुढे बोलण्याची हिंमत नौशाद यांना होत नव्हती. कारण त्या वेळी सैगल यांचे चांगले नाव झाले होते. अखेर जेव्हा सैगल यांचे समाधान झाले, तेव्हाच त्या गीताचे रेकॉर्डिंग झाले. तेव्हा ते नौशाद यांना म्हणाले, ‘आपली चाल खरोखरच सुंदर आहे; गीतही छान लिहिले आहे; पण सुरुवातीला माझाच आवाज थोडा चांगला नव्हता; पण आता काळजीचे काही कारण नाही. हे गाणे माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक ठरणार आहे.’ ते गाणे होते ‘जब दिल ही टूट गया...’

महान गायक केवळ त्यांच्या गायनाने महान बनत नसतात, तर गायनकलेसाठी घेतलेले परिश्रम आणि समजूतदार स्वभाव या सर्वांच्या आधारे त्यांची ‘ती कला हिरा कोंदणात शोभावा तशी शोभते. 

‘पैशासाठी सैगल कोठेही गातील,’ अशी टीका त्यांच्यावर एका ठिकाणी करण्यात आली. तेव्हा कलकत्याच्या एका भागातील गरीब वस्तीतील लग्न समारंभात जाऊन रात्रभर तेथे विनामोबदला गाऊन त्यांनी ‘त्या’ जहरी टीकेला कृतीने उत्तर दिले होते. 

आपल्या आईची सेवा करत असताना रेकॉर्डिंगकरिता आलेल्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ‘माझे हातातले काम झाल्यावर आपण बोलू,’ असे सांगून त्यांनी आईच्या सेवेला प्राधान्य दिले होते. 

१९४६च्या डिसेंबर महिन्यात आपल्या पत्नीसह सैगल जालंधरला गेले. तेथे थंडीने गारठलेल्या भिकाऱ्याला त्यांनी अंगावरचा कोट काढून दिला! आपला काळ जवळ आला आहे, याची जाणीव त्यांना झाली असावी. कारण नंतर अवघ्या एक महिन्यात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेत गीत वाजत होते - ‘जब दिल ही टूट गया हम जी के क्या करेंगे...’

सैगल यांची गीते ज्या काळात लोकप्रिय झाली त्या काळात गाण्याच्या रेकॉर्डिंगचे तंत्र प्रगत झाले नव्हते. आता रेकॉर्डिंगकरिता अत्याधुनिक सामग्री व तंत्रज्ञान आले आहे. १९३०ते १९४०च्या पिढीच्या तुलनेत सध्याची पिढी आवड, निवड, पेहराव, खाणे या सर्व स्तरांवर प्रचंड बदलली आहे. त्यामुळे सैगल यांचे गाणे सर्वांनाच ‘सुनहरे’ वाटेल असे नाही; पण साक्षात स्वरसम्राज्ञी लतादीदी, तसेच मोहम्मद रफी यांच्यासारखे गायक-गायिका ज्यांना गायनातील आदर्श मानत होते, त्या सैगल यांच्या गाण्यात नक्कीच काहीतरी अलौकिक होते, हे लक्षात घेऊन आपण आज त्यांचे एक गीत पाहू या!

१९३९च्या ‘दुश्मन’ चित्रपटातील या गीताची सुरुवात सैगल, ‘आ हा हा ऽऽऽ’ अशा आलापाने करून पुढे गातात -


(हे हताश मना, तुझ्या साऱ्या इच्छा निराशेच्या गर्तेत कोसळल्या आहेत.) काय करू मी आता? साऱ्या आशांचे निराशेत रूपांतर होत आहे. मी निराश झालो आहे. 

मनाच्या या निराश अवस्थेत ‘तो’ नायक म्हणतो की -

दिया बुझे फिरसे जल जाए, 
रात अंधेरी जाए दिन आए 
मिटती आस है जोत अखियन की,
समझी गयी सो गयी, करूँ क्या आस निरास भई

एखादा दिवा विझून गेला, तर पुन्हा प्रज्ज्वलित करता येतो, रात्र गेल्यावर दिवस येतो; पण माझ्या मनातील विझत चाललेली ही आशेची ज्योत? (ती या दिव्याप्रमाणे नाही. दिवस-रात्रीचा नियम तिला कसा लावता येईल?) ती आशेची ज्योत विझली की विझलीच! मग संपलेच! खरेच काय करू मी? आशा निराशेत रूपांतरित होत आहे. 

आणि अशा निराशेने काळवंडलेल्या मन:स्थितीत -

जब ना किसी ने राह सुझायी, 
दिलसे एक आवाज ये आयी, 
हिंमत हो तो संभल बढ आगे, 
रोक नहीं है कोई ... 
कहो ना आस निरास भई

(माझ्या या निराश मनःस्थितीत) जेव्हा मला कोणी मार्गदर्शन केले नाही (धीर दिला नाही त्या वेळी माझ्याच) हृदयातून एक आवाज आला (माझ्या आत्म्याला जणू परमात्म्याने सांगितले, की अरे हा संकटाचा काळ निघून जाईल. फक्त थोडा धीर धर!) हिंमत असेल तर स्वत:ला सावरून पुढील मार्गक्रमणाला सुरुवात कर. तुला कोणी थांबवू शकत नाही. (आणि मग बघ,) तूच म्हणू लागशील, की या जीवनात अजिबातच स्वारस्य नाही असे नाही. आशेचे रूपांतर निराशेत झाले आहे असे म्हणू नको; पण त्यासाठी मात्र -

करना होगा खून को पानी, देनी होगी हर कुर्बानी 
हिंमत है इतनी तो समझ ले आस बंधेगी नयी 
कहो ना आस निरास भई

(निराशेचे जीवन संपेल; पण त्यासाठी धीर धरायला हवा! त्यासाठी) कष्ट करावे लागतील, खूप कष्ट करावे लागतील. प्रसंगी रक्ताचे पाणीही करावे लागेल. त्याग करावा लागेल, समर्पण करावे लागेल, आवडत्या गोष्टी सोडाव्या लागतील. आणि हे सर्व करण्याची हिंमत असेल तर समज, की नवीन आशा मनात पल्लवीत होईल. (आणि तेव्हाच मी आता) हताश, निराश झालो असे म्हणू नकोस!

गीतकार आरजू लखनवी, संगीतकार पंकज मलिक आणि सैगल यांच्या संयुक्त कलाकृतीतून बनलेले हे गीत! ‘दुश्मन’चे नायक-नायिका सैगल व लीला देसाई हे होते. दोन मनांचा आशा-निराशेचा खेळ गायनातून समर्थपणे उभा करणारा स्वर असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या या पहिल्या नायक-गायकाला त्याच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZOTCI
Similar Posts
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...
हमसफर मेरे हमसफर... ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आठ डिसेंबर २०२० रोजी ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’मध्ये आस्वाद घेऊ या धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेल्या ‘हमसफर मेरे हमसफर’ या एका सुखद प्रेमगीताचा...
दिवाळीच्या आठवणी जागवणारी चित्रपटगीते ‘सुनहरे गीत’ या सदरात दर वेळी आपण एखाद्या कलावंताबद्दलची माहिती घेऊन त्याच्या एखाद्या गीताचा आस्वाद घेतो. आजचा लेख मात्र वेगळा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदरलेखक पद्माकर पाठकजी यांनी स्मरणरंजनपर लेख लिहिला आहे. त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणात दिवाळीच्या काळात रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या ‘सुनहऱ्या’ चित्रपटगीतांच्या
मोहब्बत जिंदा रहती है... अनेक श्रवणीय गीते दिलेले संगीतकार हंसराज बहल यांचा १९ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘मोहब्बत जिंदा रहती है...’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language